नवीन वर्षात काहीतरी नवीन करायचं मनांत होतं. छे..छे..संकल्प वगैरे काही नाही. रोजच्या कामातला तोचतोचपणा कमी होईल आणि तरीही माझ्या आवडीचं काहीतरी. कारण त्याची सक्ती व्हायला नको होती. ते मला आनंद देईल आणि माझ्या जाणीवा प्रगल्भ करेल असं काहीतरी.
पहिल्यापासूनच लिहायला आवडत होतं म्हणून हा सोप्पा पर्याय निवडला. शाळेत असताना लिहायचो तशी रोजनिशी किंवा डायरी. रोज नाही पण मला जे त्या त्या वेळी, त्या त्या प्रसंगात वाटलं असेल ते.
मग ब्लॅाग लिहायचा, फेसबुकवर लिहायचं की ज्याला नंतर पुस्तकरूप देतां येईल असं काहीतरी लिहायचं ….मला वाचक हवेच आहेत का? की माझं लिखाण फक्त माझ्या ओळखीच्या लोकांपर्यंतच मर्यादित ठेवायचंय? अशा अनेक प्रश्नांवर उलटसुलट विचार केला. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा लिहीलं किंवा तसा प्रयत्न केला तेव्हा सगळेजण म्हणत होते की ते आमच्याजवळ रहात नाही तेव्हा असं काहीतरी कर की जिथे आम्हाला परत परत जाऊन ते वाचतां येईल. हा विचार (ते परत वाचत असले किंवा नसले तरी) मला पुढे जायला मदत करणारा होता. अजून एक महत्वाचं म्हणजे त्यामुळे मी निदान आळस न करता नियमितपणे लिहीन असा विचार करुन हा सगळा खटाटोप करायचा असं ठरवलं.
याचं स्वरुप नक्कीच ललित लेख किंवा स्फुटं असं असेल….त्या त्या वेळी आलेल्या विचारांना करुन दिलेली वाट असेल. अगदी अभिव्यक्ती वगैरे म्हणण्याचं धाडस मी करणार नाही कारण अभिव्यक्ती मला फार जड आणि साहित्यिक वाटतं. तेव्हा माझं लिखाण कसं आहे, कसं असतं हे मला अगदी प्रामाणिकपणे माहीत आहे. तरीही शेवटी ती ऊर्मी स्वस्थ बसू देईना. लिहायचं ठरवलं म्हणजे त्याचं बारसं तर नक्कीच करायला हवं….खूप नावांचा विचार केला आणि ‘ संवेदना….संवाद माझा माझ्याशीच ‘ हे नाव ठरवलं.
संवाद आणि संवेदना या दोन्ही शब्दांमधला सम…एकाच पातळीवरचा, समान पातळीवर येऊन केलेला हे मला पटलं आणि आवडलं. सम वेदना…माझ्यात काहीतरी वेगळेपणानी उमटणारं, जाणवणारं. वेदना म्हटली की पहिला विचार दु:ख देणारं काहीतरी असंच मनात येतं कारण पहिल्यापासून आपण वेदनेचा संबंध कोणत्यातरी दु:खदायक गोष्टींशीच जोडतो. पण वेदना कधीतरी हवीहवीशी वाटणारी असते ….बघा ना अगदी जवळचं उदाहरण म्हणजे प्रसूतीची वेदना किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीची वाट बघण्यातली वेदनासुद्धा. तसंच कधी कधी दु:खदायक वेदना आपल्याला योग्य निर्णय घ्यायला, आपला विवेक जागरुकपणे वापरायला मदत करते. तेव्व्हा सह-अनुभूतीच्या पातळीवर येऊन केलेला संवाद म्हणजे संवेदना …..हे मी माझ्यासाठी विचार करुन केलेलं नामकरण म्हणू या हवं तर !
मग काय लिहायचं….तर मी म्हटलं तसं की हे त्या त्या वेळी वाटलेल्या विचारांचं संकलन असेल. कधीकधी कोणाशी share न करता येणाऱ्या पण लिहावंसं वाटेल अशा गोष्टीपण असतील. तर कधी एखादा अनुभव, एखादा प्रवास…तर कधी अंतर्मुख करणाऱ्या प्रसंगांचं वर्णन. त्याला कोणतंही परिमाण नसेल. कारण आता जेव्हा मी कधी मागे जाऊन माझं लिखाण वाचते तेव्हा कधी ते बाळबोध, बालिश वाटतं, कधी प्रगल्भ तर कधी ‘आपण असाही विचार करु शकतो’ याचं आश्चर्य वाटावं असंही काहीतरी सापडतंच. काही गोष्टींमधे काळानुरुप बदलही होतात मग ते आज संदर्भहीन किंवा outdated सुद्धा वाटतं. जसं ते काळानुरुप बदललंय तसं ते माझ्या आकलनावर पण तपासून पाहीलं तर तेव्हा वाटलेलं त्यावेळी योग्य आणि आज अयोग्यदेखील वाटतंच. तेव्हा जे काही लिहायचं ते तारीख वारानुसार लिहावं म्हणजे आपणच आपल्याला तपासून पाहता येतं असंही मी ठरवलंय….नाहीतर कोणती मी मी आहे हे मलाच ओळखता येणार नाही, नाही का? तसंच मला माझ्या growth साठी पण त्याचा फायदा होणार नाही. माझ्यात झालेले बदल, माझ्या वृत्ती हे सगळंही मला बघतां येईल. तेवढंच माझी मी मला कळायला मदत होईल.
तेव्हा आता अधेमधे आपण असेच लिखाणातून भेटत राहू. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला, ऐकायला मला नक्की आवडतील. तेव्हा भेटू या …..संवेदना share करायला, कारण sharing चा आनंद आणि महत्व आपण सगळे नक्कीच जाणतो. शेवटी connection महत्वाचं….तेव्हा stay connected.
डॅा. शुभांगी दातार
write to me - datshubhs27@gmail.com / follow me on Instagram - @shubhangi_datar
सहानुभूतीच्या पातळीवरून साधलेला संवाद म्हणजे संवेदना. संवाद म्हणजे द्वैत अध्याहृत आले. या द्वैतामध्ये दोन विरोधी विचारधारा स्वगत वा परगत असु शकतात.
छान. आजची सुरुवात छान झाली.
वाचून कधीच झाले होते./आज परत वाचले आणि लक्षात आले कि आपण छान म्हंटलेच नाही. न बोलता हि ते कळत पण तरीही वाटलं म्हणावं कि उपक्रम मस्तच आहे. शुभेच्या.