या लेखाच्या नावावरुन मुरांबा चित्रपट असला तरी मला गुळांबाच म्हणायचंय बरं का.
जमला बुवा ….माई आत्यासारखा गुळांबा करायला जमला. काय आनंद झाला सांगू ? तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं. गुळांबा करणं काय अवघड आहे का ? यु ट्यूब वर ढीगभर video आहेत. पण हे सगळं तुम्ही म्हणताय कारण तुम्ही तिच्या हातचा गुळांबा खाल्ला नाही ना म्हणून.
म्हणजे कसा ? असा प्रश्न तुम्ही विचारणार म्हणजे तसा प्रश्न तुमच्या मनात येणार हे नक्की.
तर माई आत्यासारखा म्हणजे फोडी अगदी तशाच राहिल्या हव्यात, रंग काळपट नको पण केशरी हवा, रस अंगाबरोबर हवा, हलकासा लवंगांचा स्वाद आणि अती गोड नको आणि आंबट तर अजिबातच नको. आता हे इतकं सगळं साध्य करायचं आणि अगदी तस्साच गुळांबा करायचा म्हणजे किती टेन्शन.
आता, मला इतका आनंद का झालाय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि अहो हे ती उत्तम करत असलेल्या अनेक उत्तम पदार्थांपैकी हा एक पदार्थ ….असे अनेक तिची सही (signature) असणारे पदार्थ अजून मला जमायचे आहेत. पण असे काही काही जमले ना की वाटतं की त्या AI नी एवढी प्रगती करावी की हे असं काही जमलं की ते थेट तिच्यापर्यंत पोचावं.
माई आत्या नुसतीच सुगरण नव्हती बरं का ….तर जेवणाचा बेत कसा असावा यावर तिची पीएचडी होती. आकर्षक रंगसंगती, कशाबरोबर काय केलं तर अपायकारक नसेल, कोणत्या चमच्याने ( उलथणं, डाव, पळी, झारा) काय करायचं, वाढायला काय घ्यायचं एक ना अनेक.
गवारीच्या कांदा घालून केलेल्या भाजीबरोबर कढी चालेल, मुळा घालून आमटी केली तर भाजी गोडसर हवी. उकडून बटाट्याची भाजी पिवळ्या रंगाची म्हणून जोडीला केशरी रंगाची गाजर टोमॅटोची कोशिंबीर चालेल. भारंगीच्या भाजीत भाजणी किंवा वाल हवेतच. थालीपीठ किंवा भाजणीचे वडे थापले तर त्यावर बोटांचे ठसे असता कामा नयेत. नारळाच्या वड्या करताना बाजूनी सारण कोरडं व्हायला लागलं की खाली उतरवून चांगलं घोटायला हवं म्हणजे वड्या उखीरवाखीर होत नाहीत. वड्या पाडताना तिच्याकडे अगदी बघत रहावं. तीच सुरी, तसाच कोन (angle) आणि सगळ्या वड्यांचा आकार एकसारखा.
मी एकदा एक छोटा झारा आणला तर म्हणाली, अगं तळण जास्त असलं की हात भाजतो. कमी तळण असेल तेव्हा ठीक आहे. म्हणजे थोडक्यात मी काही योग्य केलेलं नाही. अरेच्चा ! खरंच की. एवढा विचार मी केलाच नव्हता. लोखंडाच्या काहीशा उथळ कढईत कोरडं पिठलं करावं तर ते फक्त तिनेच. मऊ भात जमला ना की सगळे पदार्थ करायला जमतात म्हणायची.
काम नीटनेटकं, चोख नियोजन, कितीही माणसं आली तरी टेन्शन नाही. आत्तासारखे तेव्हा blogs, vlogs नव्हते पण ही अशी authentic विद्यापीठं आमच्या घरातच होती. तिचं you tube channel असतं तर आज लाखो subscriber असते यात शंकाच नाही.
एका गुळांब्यावरुन हे सगळं आठवण्याचं कारण असं की खाद्य संस्कृतीला आपण तितकंसं महत्व देत नाही. अर्थात आता अनेक channels च्या माध्यमातून आपल्यासाठी ही सगळी माहिती उपलब्ध होते आहे. फक्त गंमत अशी आहे की माहिती मिळताच पदार्थ जसाच्या तसा करता येतो पण बिघडला ना की तो दुरुस्त करण्यासाठी मात्र ही माई आत्यासारखी मंडळीच लागतात. मला आठवतंय की अगदी आत्ता आत्तापर्यंत म्हणजे ती होती तोपर्यंत चकली आणि पाकातली पुरी ह्या दोन पदार्थांची सुरवात तिला सांगूनच करायची. म्हणजे कोणतंही महत्वाचं काम करताना आपण देवाला नमस्कार करतो ना तसंच.
आत्ता जरी या सगळ्याला glamour आलं असलं तरी पदार्थ करता येणं आणि संस्कृती म्हणून त्याचा विचार होणं यात खूप फरक आहे. पोट भरणं आणि तृप्तीची ढेकर येणं यात फरक आहे …नाही का ?
बघा ना आज आपण अनेक वेगवेगळे जगभरातले पदार्थ हवे तेव्हा खातो. पण तरीही दररोज काय खायचं हा प्रश्न पडतोच. इतकी विविधता असूनही तोचतोचपणा का बरं वाटतो ? साधं गोडं वरण भात, तूप, मीठ, लिंबू याचं समाधान वेगळंच असतं आणि ते कोण कसं करतंय यातही असतंच. अगदी ताटात आपण पदार्थ कसे वाढतो यावरही जेवावंसं वाटतं …हो की नाही ? जेवताना आपण रंगसंगती, घटक पदार्थ, मांडणी या सगळ्याचा विचार तरी करतो का ? वाढून घेतलेलं ताट प्रेमानी न्याहाळतो का ? प्रत्येक पदार्थाचा वेगवेगळा पोत जिभेला जाणवतो का ? सकाळी न्याहारी काय केली ? काय जेवलो हे आठवतं का ?
म्हणूनच या गुळांब्याची चव ही तिची खास होती कारण त्या पदार्थात ‘ती’ होती. आपण असतो का आपल्या पदार्थात? असलो तर किती वेळा असतो ? स्वैपाक करतो… का कधी कधी उरकतो सुद्धा. माइंडफुलनेस असाही जपता येईल कारण शेवटी माइंडफुलनेस म्हणजे तरी काय ? तर हे असं क्षणस्थ (ज्या क्षणी जे करतोय त्या क्षणात कायावाचामने स
रमून जाणं ) असणंच नाही का ?
पदार्थाचा असाही विचार व्हायला हवा. आणि आपणही आवर्जून हे करायचं ते एवढ्यासाठीच. मी नाही केलं तर माझ्या मुलीला अर्थात पुढच्या पिढीला कसं कळेल? आणि हे सगळं संक्रमित व्हायला हवं. साधेपणाने केलेल्या गोष्टी किती निखळ आनंद देतात कारण त्याला आपलेपणाची चव असते.गच्चीवर वाळत घातलेल्या अर्धओल्या चिकवड्या, कुरडयांना येणारा तो उन्हाचा गंध आणि करणाऱ्याच्या हळुवार स्पर्शाची सर दुसर्या कशाला कशी येणार ? आता सगळं पूर्वीचंच परत आलंय असं आपण म्हणतोय पण ते ही व्हायलाच हवं. संस्कृती जपायचा हा ही एक महत्वाचा मार्ग आहे ना. खाण्यासाठी जन्म आपुला हे जरी म्हणायचं नसलं तरी खाण्यासाठी खाण्यात अशी मनाची गुंतवणूक असेल तर क्या बात है…..
तर अशी ही गुळांब्याची गोष्ट.
शुभांगी दातार
१७/०५/२०२५
खरंच. ..असं वाचताना आजीच्या आठवणी ताज्या झाल्या . पूर्वी सारखं आता नाही आपण म्हणतो पण आपणही विकतच आणतो. पूर्वी सगळ्या गोष्टी तळणीचे पदार्थ, लोणची पापड घरीच केलं जायचं. आणि त्याची चव वेगळीच असायची. दिवाळीलाच चिवडा, लाडू ,चकल्या असे अनेक पदार्थ असायचे आता दररोज हे सगळं मिळत. असो. ...छान लिहिले आहे👌
खूप छान झाला असं वाटतं मुरंबा तोंडाला पाणी सुटलं मला खूप आवडो आणि छान बरणीत भरलाय 👌😋😋