ही दोन छायाचित्रं आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहेत. तसं कशाला ? खरंतर आपल्या परीसरात हे वारंवार घडताना आपण पहात असतो. बरं गंमत अशी की कोणताही सीसी टीव्ही कॅमेरा हे कोणी केलं असेल हे दाखवू शकत नाही. याचं कारण आपण भीतीपोटी हे शोधण्याचा प्रयत्नच करत नाही.
भीती ? छे बुवा त्यात काय घाबरायचं ? आम्हाला नाही हं काही वाटत. पण बघा हं ! आपण या लोकांचे दोन गट करु. एक असतो काय लोक असतात, आपल्याला काय करायचंय असं म्हणणाऱ्यांचा आणि दुसरा असतो देव कोपेल किंवा आपण कसं घरात आणणार , कोणाचा आहे , बाहेर का ठेवला असेल ? , आपण आपलं मनोमन नमस्कार करुन पुढे जावं. त्यातही मनोमन नमस्कार अशासाठी की कोणी आपल्याला नमस्कार करताना बघितलं तर काय म्हणतील या गटामधले.
(आता त्या मूर्तीला कोणी so called भक्तानी सूर्याभिमुख करुन ठेवलंय. बहुदा बाप्पाच्या D3 ची काळजी असावी.)
परत एकदा ती दोन छायाचित्रं आपण नीट पाहिलीत ना तर त्या दोन जागांमधलं अंतर जेमतेम २५ ते ३० फूट एवढंच आहे. हे पाहिल्यावर वाटतं की काय मानसिकता असते हे असं करण्याची. मला नकोय पण विसर्जन करायची किंवा टाकून देण्याची भीती वाटते आणि असं कृत्य घडतं. म्हणजे मी सुटलो आणि इतर लोक म्हणजे समाजातले अन्य घटक काय ते बघून घेतील. बरं दुसरं म्हणजे जी माणसं ह्या मूर्ती ठेवतात ते जर का भक्त असतील तर मग इतक्या मोठ्या कचऱ्याच्या ढीगाजवळ माझा देव मी ठेवते/ठेवतो हे कसं बुवा चालतं या भक्तगणांना कोण जाणे. माझी सोसायटी १०५ कुटुंबाची आणि माझं संकुल ४०० कुटुंबांचं पण याविषयी माझ्यासारखी चार दोन लोकं सोडली तर कोणी साधा विषयसुद्धा काढत नाही. कारण आपल्या सगळ्यांवर लहानपणी झालेला सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे देवबाप्पाला नमस्कार कर हं नाहीतर देवबाप्पा रागावेल. हे इतकं खोलवर रुजलेलं असतं की आता ते unlearn किंवा relearn करणं शक्यच नाही.
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव समजून घेणं, समजावून सांगणं हे काही येरागबाळ्याचं कामच नसतं मुळी. तेव्हा विचार करणं , विचार मांडणं या गोष्टी फारच कठीण. बरं कठीण प्रश्न सर्वात शेवटी किंवा न सोडवण्याची सवयसुद्धा लहानपणापासूनच जोपासलेली. त्यामुळे या विषयावर भाष्य कोण करणार ? असं करता करता आमच्याच संकुलामधल्या एका वडाच्या झाडापाशी अशाच वेगवेगळ्या मूर्तींची भाऊगर्दी झालेली आहे. घरं सोडून जाताना, फर्निचर किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे घराची रचना बदलताना आपल्याला आता नकोशा झालेल्या गोष्टींबरोबर देवाच्या मूर्तींची रवानगी होणं खेदजनक वाटतं नाही का ? असो आजकालच्या भाषेत या अशा गोष्टींमध्ये #भक्ती म्हणून व्हायरल होण्याची पूर्ण क्षमता असते.
बरं जी तज्ञ मंडळी यांना काही वास्तुविषयक सल्ला देतात त्यांनी या गोष्टींचं काय करायचं ह्याचंही मार्गदर्शन करावं. त्यांच्या syllabus मधे याचा विचार व्हायला हवा. कारण जे सल्ला विचारायला येतात ते त्यांना हे निश्चित विचारणार नाहीत. कारण देव कोपण्याची भीती असते ना त्यांना. ते तरी काय करणार बापडे. कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबांची वाताहत झाली, काहीजण घरी परत येऊदेखील शकले नाहीत मग त्यांच्या घरातल्या देवांनी काय करावं ? मला गंमत वाटते की त्यांच्या घरातल्या वस्तूंचं काय करायचं याविषयी ही माणसं चर्चेत हिरीरिने पुढे असतात पण देवांना मात्र नको बाई जबाबदारी म्हणून नाकारतात. हे ह्यांचा देव बघत नसेल का ? चुकून हे माझं article खऱ्याखुऱ्या भक्तांनी वाचलं तर त्यांच्या भीतीत भरच पडेल म्हणून त्यांची आधी क्षमा मागते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात इतकं काय serious व्हायचं कारण आहे. पण मला खरंच असा प्रश्न पडतो की हे का करायचं ? मला नकोय म्हणून मी माझी सुटका करुन घेणार आणि मग इतरांना त्रास होतो त्याचं काय ? त्यात काय त्रास असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ? तर त्रास असा की जर कोणी त्याचं काय करावं याविषयी सल्ला दिला तर इतर प्रत्येकाचं मत वेगळं असणार त्यामुळे त्यावर निर्णय होणारच नाही असे अनेक चर्चांचे फड रंगणार. बरं ते तिथेच न थांबता पुन्हा आपण त्या एका प्रसंगावरुन एकमेकांविषयी ठाम आणि आग्रही मतं मांडणार. (त्यासाठी विषयांची काही कमी नसते. त्यामुळे आणखी एकाची भर नको. ) बरं सरतेशेवटी या गोष्टी हळूच लपूनछपून नदी सागरांना मिळतात नाहीतर चक्क कचरावेचक व्यवस्थापनाच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विल्हेवाट लागताना दिसतात. किंवा एकाचे चार, दहा ,वीस होऊ लागतात.
दुसरं म्हणजे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी जाऊ दे तू कशाला एवढा विचार करतेस सोडून दे ना या सदरात मोडतात. मग त्या सवयीच्या होतात आणि त्याचा शिरस्ताच होऊन जातो. मी जर कोणाशी हे बोलले तर लगेच १० पैकी ८ व्यक्ती मला हेच सांगतात की त्यांच्याकडे पण असंच होत असतं. मग मला प्रश्न पडतो की हे कोणीच काहीच का करत नाहीत. वादविवाद न करता त्या व्यक्तींशी संवाद साधतां येईलच ना. पण आपण आधीच इतके पूर्वग्रह, अनुभव, आपले अंदाज यांत गुरफटून जातो की संवादाच्या सगळ्या वाटा आपोआपच बंद होतात. अशा अनेक गोष्टी चलता है या प्रकारात मोडतात. मी उदाहरणादाखल एकावरच भाष्य केलं इतकंच.
लिहीता लिहीता एक तुफान कल्पना सुचली आणि हुश्श झालं. थांबा, थांबा ! लगेच सांगते. तुमची उत्सुकता कशाला ताणायची. तर काय आहे की माझ्या सोसायटीमधे आता redevelopment होणार आहे. संबंधितांना सांगते की ह्या मूर्तीची योग्य काळजी घेतली तर सगळे अडथळे दूर होऊन आपला मार्ग सुकर होईल. म्हणजे ते सगळे अगदी त्वरेने कामाला लागतील.
चला तर bye, bye. मी जरा संबंधितांना भेटून येते. कधीतरी सांगीनच त्याचं पुढे काय झालं ते…..आपण आता गप्प रहायचं असं मी ठरवलंय हो पण काय करु ये दिल है के मानता नहीं ! (अशी अवस्था अनेकदा होते).
डॅा. शुभांगी दातार
write to me - datshubhs27@gmail.com
follow me on instagram - @shubhangi datar
असं तर नसेल ना कि कोणी घाण टाकू नये म्हणून मूर्ती तिथे ठेवली गेली आणि ती जागा सोडून इतर ठिकाणी घाण फेकली गेली.
इतरही काही अँगल्स असू शकतात
विषय खर तर तसा गंभीर आहे .पण उत्तमरीत्या मांडला आहे