



माझ्या आजे सासूबाईंचा पांडुरंग लाडका आणि माझ्या त्या लाडक्या. त्यामुळे माझीही त्या पांडुरंगाशी नकळत जवळीक झाली. खूप पूजाअर्चा, व्रतवैकल्य , नेम, स्तोत्र पठण हा माझा कुठलाच पिंड नसला तरी वेळ पडली तर हे मी अत्यंत हौसेने, प्रामाणिकपणे आणि भक्तिभावाने करते.
वारी संदर्भातील पुस्तकं, आख्यायिका, आजे सासूबाईंनी सांगितलेल्या गोष्टी , इतर काही वारी करणाऱ्यांचे अनुभव अशा अनेक गोष्टी होत होत्या. त्या आधी वारीला जायच्या आणि नंतर मात्र वयापरत्वे जमेनासं झालं तेव्हा चातुर्मासात पंढरपूरला खोली घेऊन त्यांच्या पांडुरंगाच्या सहवासात रहायच्या. भक्ती करायची पण त्यात कधीही अट्टाहास, बंधनं, दुराग्रह , जाचक ठरतील असे रितीरिवाज नव्हते. त्यांच्या त्या भक्तीमध्ये या कशालाच थारा नव्हता. त्या आणि त्यांचा पांडुरंग यांचं नातंच तसं होतं. असो.
या सगळ्या गोष्टींमुळे वारीचं आकर्षण निर्माण झालं होतं. दरवर्षी ठरवायची आणि मनात आलेली इच्छा मनातच विरुन जायची. दरवर्षी निश्चय करायचा आणि दरवर्षी तो मोडून पडायचा. त्या गोष्टीची खंत अशी नव्हती. कधीतरी जमेल अशी खात्री होती.
तसा योग यावर्षी आला आणि वारीचा पहिला आळंदी ते पुणे हा टप्पा यथासांग पार पडला.
वारी बद्दल आत्तापर्यंत अनेक लोकांनी अनेक अनुभव लिहिलेत. आपण लिहू या की नको. What's app आल्यापासून आपण सगळे जरा अतीच व्यक्त होतोय असंही वाटत होतं. त्यामुळे लिहीण्याची जरा टंगळमंगळ करत होते. तरीपण काल माझे एक स्नेही मला म्हणाले ...काय हे तू काही लिहीतच नाहीस. म्हणून म्हटलं लिहू या थोडं काहीतरी.
मी म्हटलं ना की त्या कधीही वारी करावी म्हणून आग्रह करत नव्हत्या पण गप्पा मारताना मी समजा म्हटलं की मला एकदा जायचंय तर फक्त छानसं मंद स्मित करायच्या. मी एकदा जाऊन आले तरी भेटलेल्या सगळ्यांना एकदा तरी जाऊन या असा आग्रह केला त्याचीच आत्ता आठवण येत्येय. आपला अनुभव कोणी विचारला तर तेवढं सांगून गप्प बसायला हवं हा पहिला धडा मिळाला.
प्रत्येकाचा अनुभव वेगळा हा दुसरा धडा.
पालखी दिसते तेव्हा डोळ्यात आणि हृदयात जे काही लकाकून जातं त्यात एक प्रचंड ऊर्जा असते. ती ऊर्जा प्रत्येक वारकऱ्याला पंढरपूरला कळस दर्शन घडवते हा तिसरा धडा. त्यामुळे कसे बुवा इतकं चालतात हा प्रश्नच आता पडणार नाही कारण मी आता तसा अनुभव घेतलाय.
आपल्या comfort zone च्या बाहेर जाऊन आपण जेव्हा या गोष्टी करतो तेव्हा आपल्या comfort zone ची व्याख्या तपासून पहायला हवी याचं भान आलं.
एक प्रसंग सांगते. विश्रांतवाडीला जेवण्यासाठी थांबलो होतो. प्रत्येक जण आपापले डबे उघडून एकमेकांना देत होते. काहीतरी देवाणघेवाण करताना मागून एक अनोळखी आवाज आला....हे तुम्हाला नको असेल तर देता का ? आम्ही जेवायचं काही आणलं नाहीये. त्यांचं वाक्य संपायच्या आत अहो घ्या ना असं म्हणणारे दहा आवाज आणि किमान १५ वेगवेगळे पदार्थ त्यांच्यासमोर होते. कोण बोलतंय, आणायचं नाही का , आधीपासून माहीत होतं तरी काय ही लोकं , बिनधास्त मागतात काय वगैरे असे कोणतेही प्रश्न तिथे आजूबाजूला असलेल्या २५/३० जणांपैकी कोणालाही पडले नव्हते. हीच असेल का वारीची ताकद ? असाही एक धडा मिळाला.
माझी आई म्हणाली चालशील का एवढं ? मी म्हटलं हो आधी जाते तरी ...मग पुढचं पुढे. पण पावलं आपोआप पडत होती आणि पुढे पुढे जात होतो आम्ही. तेव्हा करके देखो ही पण एक गोष्ट मनात अधोरेखित झाली.
इतका उत्साह की आता परत जायचं की नाही ही शंकाच निर्माण न होता पुढच्या वर्षीचं time table वारीच्या भोवती म्हणजे वारीचे दिवस सोडून करायचं अशी खूणगाठ बांधून टाकली.
त्या जे शांत, स्निग्ध हसायच्या त्या साऱ्याचा अर्थ उलगडला. मिळालेले धडे गिरवायला हवेत आणि मी ते गिरवीन असं वचन त्यांना मनोमन दिलं. प्रत्येक पावलावर त्यांची आठवण सोबतीला होती. वयाच्या १०१ व्या वर्षी दोनच वर्षांपूर्वी त्यांना पांडुरंग म्हणाला की आता बास. भौतिक जगातली तुझी वारी खूपदा झाली. आता नको करुस. इथे माझ्याकडेच ये.
मी आणि माझ्या तीन नणंदा मिळून आम्ही वारीचे वेगवेगळे टप्पे पार केले. त्यांना खूप आनंद झाला असता, झाला असेलच नक्की. फक्त त्या आमच्याशी बोलायला नाहीत पण त्यांना तसाच निर्मळ आनंद झाला असेल.
येई आषाढातील वारी
येई सखा पांडुरंग दारी
दोन पावले चालू या
सावळे रुप पाहू या
भेदाभेद विसरुन
विठ्ठल नाम घेऊ या
रामकृष्ण हरी!
डॉ. शुभांगी दातार
खूप छान लिखाण शुभांगी.मी पण lockdown च्या आधीच्या वर्षी आळंदी ते पुणे हा टप्पा चालले होते पालखी बरोबर. आणि मला पण असच वाटले की हा अनुभव असा आहे की तो प्रत्येकाने घ्यावा. शब्दामध्ये सांगितले तरी त्याची प्रचिती हवी असेल तर एकदा तरी एखादा टप्पा तरी पालखी बरोबर चाला आणि वैष्णवांच्या भक्ती चा अनुभव घ्या. अतिशय निस्सीम आणि निस्वार्थ भक्ती अनुभवा.
खूप छान अनुभव! आम्हासआपल्या लेखातून घडला, धन्यवाद! पांडुरंग पांडुरंग पांडुरंग...