आज थोडीशी वेगळी, रोज दिसणारी अमेरिका. पर्यटनस्थळं सोडून उरलेली. कारण weekend सोडले तर इतर दिवशी सगळेजण फार म्हणजे फारच बिझी असतात.त्याविषयी आपण नंतर बोलू.
सकाळी बहुतांशी लोक म्हणजे कुटुंबात राहणारे, लवकर उठून मुलांना शाळेत सोडणे वगैरे अशी कामं करतात. ॲाफीसला जाणारी साधारण ८३०/८४५ ला निघतात. एकटी राहणारी मुलं मुली जर युनिमधे (म्हणजे विद्यापीठात) असतील तर त्यांचं आणि नोकरी करणाऱ्या मंडळींचं वेळापत्रक जरा वेगळं असतं. पण कमी अधिक फरकाने रस्त्यावर सतत वर्दळ चालू असते. तरुणांच्या देहबोलीमधून एक वेगळी मोकळीक, सैलावलेपण असल्याचं जाणवतं. अमेरिका आवडण्याचं ते एक महत्वाचं कारण असावं असं वाटतं. जितकी लोकं गाड्या चालवत असतात तितकीच रस्त्यावर चालताना दिसतात. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकी सोयीची असतेच असं नाही आणि कधीकधी ती खिशाला परवडणारी नसते त्यामुळे माणसं चालणं जास्त पसंत करतात. हवामान चांगलं असेल तर तशी काही दमणूक देखील होत नाही. २:३०/३ च्या सुमारास आया गाडीघोडे (घोडे म्हणजे बाबगाड्या) आणि त्यांची पेट्स घेऊन मुलांना शाळेतून आणायला आणि मग वेगवेगळ्या activities ना सोडायला जातात. ट्रॅफिक हा विषय तसा विरळाच असतो. पण त्यांच्यापुढे पाच एक मिनीट सहा सात गाड्या सतत असतील तर ते त्याला ट्रॅफिक म्हणतात हे सांगणं आवश्यक आहे. नोकरी करणारी मंडळी संध्याकाळी ६/७ च्या दरम्यान घरी येतात. अगदी डोक्यावरुन पाणी म्हणजे ८. यात काय विशेष ? कशाला हे पाल्हाळ ? असं वाटलं असेल ना…पण असू दे. कारण आता खरी गंमत आहे.
आता गंमत अशी आहे की तरी ते फक्त वीकएण्डलाच फोनवर बोलायला किंवा भेटायला उपलब्ध असतात. त्यांच्या कामांचा, ताणाचा, वेळापत्रकाचा, इच्छांचा मला संपूर्ण आदर आहे हं….अगदी मनापासून सांगते आहे. शेवटी रोज रहाणाऱ्यांना काय ते माहीत….नाही का ? तसं पाहीलं, तर आता ही परिस्थिती भारतातही आहेच. कोणीही बोलावलं की आधी आपण कसे आणि किती बिझी आहोत हे सांगण्याची अहमहमिका असते. त्यामुळे अतिथी म्हणून तुम्ही कोणाकडे जाऊ शकत नाही. कारण अतिथी म्हणजे अ - तिथी (जो तिथी न पहाता येतो तो अतिथी असतो) नसून त्याचा पाहुणा झालेला असतो. आता तुम्ही म्हणाल, तसं नाही गं आयत्या वेळी कोणी आलं तर त्याला म्हणे नीट अटेण्ड करता येत नाही. मग मला आठवतं की आम्ही लहान असताना आमची एक आत्या पेणहून निघाली की कोणीतरी कळवायचं की अमक्या एसटीला बसवून दिलंय. दळणवळणाची आणि संपर्काची साधनं तुटपुंजी असताना आंबे फणस घेऊन ती निघायची आणि आम्ही तिला आणायला जायचो. कोणाच्या चेहऱ्यावर समस्या किंवा कपाळावर आठी नसायची. तक्रार नाही बरं का पण दैनंदिन जीवनाचं वर्णन करत्येय म्हणून ओघात सांगितलं. पण इतकं औपचारिक कसं काय बुवा जमतं कोण जाणे ? अशा गोष्टींनी स्पेस, प्रायव्हसी जपली जात नाही आणि हे सगळं मॅनर्स, एटीकेट्स च्या हल्लीच्या चौकटीत बसत नाही. तर अशी सगळी गंमत आहे. बरं समजा गेलोच आपण आणि असलं त्यांना काम तर ते त्यांनी करावं ना….आपण थांबू की घरात. पण तसं पण नाही.असो. तरीही नियमाला अपवाद असतात हे लक्षात घेऊ. आपले आईवडील पाहुणे आल्यावर युटिलिटीज आणि ग्रोसरीची व्यवस्था कशी करत होते कोण जाणे ? असा प्रश्न पडतो. संध्याकाळी ६/७ वाजता घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० पर्यंत हव्वा तेवढा वेळ असतो. असे सगळे विचार मनात येतात पण तसं काहीच कोणाला विचारायचं नाही हे पथ्य मी पाळते. बरं आम्हाला आठवड्याभरात कोणी येऊन असं डिस्टर्ब केलेलं आवडत नाही हा त्यांचा चॅाईस असूच शकतो. पण त्याला वेळ नसण्याचं कोंदण का बरं असतं. थोडक्यात काय तर वीकएण्डशिवाय कोणी कोणाकडे जायचं नाही. असो.
अजून एक इथली पद्धत म्हणजे मुलांना अनेकविध ‘activities’ मधे गुंतवून टाकायचं. एकच आयुष्य आहे ….सगळं काय ते आत्ताच करायला हवं. अशी घाई मला दिसते. युक्तिवाद असा की त्याला किंवा तिला सगळं छानच जमत असतं. किमान तीन activity प्रत्येक मूल करताना दिसतं. त्याच्या खोलात जायचं काही कारण नाही आणि लेखाचा तो विषयही नाही. असो.
मी जेव्हा लोगनला आले होते ना तेव्हा तिथे आजूबाजूला टुमदार अशा घरांची बांधणी चालू असायची. तेव्हाही मला अप्रूप होतं की सतत डोक्यावर मुकादम नसताना माणसं निमूटपणे त्यांना दिलेलं काम अत्यंत चोखपणे वेळापत्रकानुसार कसं काय करतात नाही. मला फारच कौतुक वाटायचं. एक दोन दिवस नाही तर सातत्याने तीन महीने हे मी पाहीलं आहे. विडी, सिगारेट किंवा तंबाखू खाताना मला तरी कोणी दिसलेलं नाही. तसंच आत्ता मी जिथे आहे तिथे बाजूला एक पाडकाम चालू आहे. ते ही अगदी शिस्तीत. इतकं देखणं आणि नीटनेटकं की काही विचारता सोय नाही.स्वैपाकघरात बसून मी रोज न चुकता सकाळी ६ वाजता त्यांची वाट बघत असते. तर ते बरोब्बर ५:५८ लाच हजर असतात. अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रामाणिकपणे काम करत असतात. फसवणारे असतीलच, आहेत तरीही मी पहाते ते मात्र मला असंच काम करताना दिसतात. दर ठिकाणी मी त्यांची स्वघोषित मुकादम असते तो भाग अलाहीदा !
रस्त्यातून चालताना उजवीकडून चालायचं, कोणाकडे बघायचं नाही, हळू बोलायचं कारण याविरुद्ध काही केलं तर ते लोकांना रुचत नाही. त्यांचे त्यांचे शिष्टाचार. (म्हणजे शिष्ठासारखे काय रे भाऊ ? )
वर मी म्हटलं ना तसं हे लोक अनेक मॅनर्स, एटिकेट्स पाळत असतात पण मला मजेशीर गोष्ट वाटते म्हणजे तुम्ही कुठे खायला गेलात की ही भली मोठ्ठी सॅंडविचेस, न चिरलेल्या मोठ्या भाज्यांची, पानांची सॅलड्स आणि मोठ्ठा पोर्शन साइज म्हणत ‘आ’वासून खाव्या लागणाऱ्या गोष्टी. अर्ध्या गोष्टी खाली तरी सांडतात, नाही तर वेडीवाकडी तोंडं करत खाव्या लागतात. तेव्हा समोरच्याला कसं वाटत असेल हे काही ह्यांच्या शिष्टाचाराच्या चौकटीत कसं काय बसतं ब्वा ? (बुवा म्हणायचंय मला पण त्याची तीव्रता कळावी म्हणून ब्वा ) मला तेव्हा माझ्या एका सरांची आठवण येते. एकदा मी आणि ते हॅाटेलमधे गेलो होतो. तेव्हा त्यांनी सहज बोलता बोलता एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते…शुभांगी एक गोष्ट सांगतो तुला. कधीही आपण कोणत्याही formal set up मधे असू ना तेव्हा असा पदार्थ मागवायचा की जो चेहऱ्याच्या कमीतकमी हालचाली करुन खाता येईल. हा सल्ला ह्यांनाही द्यावा असं माझ्या खूप वेळा मनात येतं. ग्रोसरी स्टोरमधे गेलात तरी सगळ्या गोष्टी भल्या मोठ्या पॅकिंगमधे आणि बऱ्याच जणांच्या ट्रॅालीज तर सामानानी भरुन वाहत असतात. जसं काही आता पुढचे सहा महीने यातलं काही मिळणार नाही.
हे सगळं मी फक्त जीवनशैली कळावी म्हणून सांगते बरं का ! सगळी लोकं सकाळी मात्र खूप लवकर उठतात. आणि रात्री लवकर झोपतात. तरुणाईचा अपवाद सोडला तर रात्री सात नंतर सगळ्या घरांचा चेहरा सारखाच दिसतो. सगळी लोकं सकाळी लवकर चालायला, व्यायाम करायला बाहेर पडतात. सकाळी १०:३०/११ आणि रात्री ७ वाजता जेवून घेतात. ते पाहून लवकर निजे, लवकर उठे ची आठवण येते. कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही असा attitude असतो. ज्येष्ठ नागरिक पण सायकलिंग करताना, व्यायाम करताना, वॅाक घेताना दिसतात. काही जणांकडे सहज चालवता येणाऱ्या व्हीलचेअर असतात. कुठेही नेता येतील अशा त्या व्हीलचेअर बघून गंमत वाटते आणि त्यांचं जीवन ते किती सुलभ करुन घेतात असं मनात येतं. तंत्रज्ञानातील प्रगतीचा हा फायदा त्यांचा प्रवास सुकर करतो.
कोविडनंतर वाढलेल्या बेकारीमुळे मात्र चोऱ्या, गुन्हेगारी आणि बेघर लोकांचं प्रमाण यात लक्षणीय वाढ झालेली दिसते. वीड नावाने जो अमली पदार्थ सेवन करतात तो इथे कायद्याने संमत असल्याने त्याचं सेवन सर्वदूर अधिक प्रमाणात होताना दिसतं. त्याचा एक नकोसा वास हवेत भरुन राहिलेला असतो. रस्त्यावरून चालताना किंवा ट्रेनमधे सुद्धा तो भरुन राहिलेला असतो. आपली इच्छा असो वा नसो तो काही टाळणं शक्य होत नाही. अमेरिकेसारख्या देशात communication platform असोत किंवा behaviour modification centres असे अनेक वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात पण दुसरीकडे हे असं चित्रं दिसतं, ते अस्वस्थ करणारं असतं. तसाच एक प्रयोग इथे करतात ज्याला ते inter generational learning म्हणतात. यात वृद्धाश्रमातील आजी आजोबांना किंडरगार्टन शाळांमध्ये नेतात जेणेकरुन मुलांना आजी आजोबांचा आणि आजी आजोबांना मुलांचा सहवास मिळेल. सहवासाचं हे वाढलेलं महत्व सद्य परिस्थितीचं बोलकं चित्र आहे असं मला वाटतं. कमी होत चाललेला संवाद वाढवण्यासाठीचे हे प्रयत्न कधी केविलवाणे वाटतात तर कधी निदान काहीतरी प्रयत्न चालू आहेत असंही वाटतं.
दुसरीकडे ह्याच अमेरिकेमधे मोठ्या प्रमाणावर भावनांक म्हणजेच emotional quotient (EQ) वर काम होताना दिसतं. आणि मग फक्त वीकएणडला संवादासाठी खुली असणारी ही संस्कृती ते दोन दिवस भरभरून जगते आणि राहीलेले दिवस आपापल्या कोषात SOP operated वागते हेच मुळात मला emotional roller coaster वाटतं. हे काही फक्त अमेरिकेतलं चित्र आहे असं नाही हे ही तितकंच खरं आहे. तेव्हा अशी एक गोंधळलेली अवस्था होते पण मग माझाही वीकएण्ड येतो आणि मग मी पुन्हा एका नवीन ठिकाणाला भेट द्यायला सज्ज होते.
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे प्रत्येक देश, प्रांत नवा असतो आणि माणसाला सतत नव्याची ओढ असते. त्याचं कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून तर तो नद्या, डोंगर पार करत वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला जातो. वेगवेगळ्या संस्कृती, त्यांचा विकास, राहणीमान, हे सगळं त्याला भुरळ घालत असतं. कशाचंही शब्दचित्र रेखाटणं माणसाला आवडतं. म्हणून आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात, पुराणातल्या गोष्टी ऐकताना नाही का आपण शब्दचित्रं आपापल्या कल्पनेने चितारत होतो तसंच. पर्यटनाचा अनुभव शहाणा आणि समृद्ध करणारा असतो. कितीतरी नवीन शिकायला, आत्मसात करायला मिळतं. आज फरक इतकाच पडलाय की प्रवास हा शिक्षण, अर्थार्जन, नैसर्गिक आपत्ती, व्यापार ह्यासाठी होऊ लागला आणि त्यामुळे हे विश्वचि माझे घर म्हणत सगळं जग ‘ग्लोबल व्हिलेज’ झालं. भाषा, संस्कृती, राहणीमान , जनजीवन यातला फरक आता जाणवेनासा झाला आणि माणसांच्या आचारविचारात एक प्रकारची लवचिकता आली. केल्याने देशाटन म्हणतात ना तसं चातुर्य आणि शहाणपण येतं त्यामुळे सोने पे सुहागाच म्हणायला हवं नाही का ? तेव्हा जे दिसेल त्यावर चर्चा करणं, होणं, त्यात चूक बरोबर असं खंडन करणं आणि त्यातून एक नवा विचार, नवी कृती होणं यासाठी हा सगळा खटाटोप करावासा वाटतो. तेव्हा रामदास स्वामी म्हणतात ते आठवत रहातं की
सृष्टीमधे बहुलोक, परिभ्रमणे कळे कौतुक ॥
तेव्हा भटकंती चालूच ठेवते आणि पुन्हा भेटू असा संकेत देते.
शुभांगी दातार
०२/०२/२०२५
अप्रतिम वर्णन.
अमेरिका आवडण्याची दोन कारणे - अंतर्मुख होण्यासाठी आवश्यक निवांतपणा आणि तेथील जीवनशैलीतील सैल मोकळेपणा!
स्वतःच्या खाजगीपणाची जपणूक करणे अल्टिमेट!
भारतीय नजरेतून पाहिलं तर त्यांचे शिष्टाचार शिष्ठ वाटणं साहजिकच!
मोठ्ठ आणि लठ्ठ सँडविच खाताना पाहताना तुझा ' आ ' मोठ्ठा झालेला दिसला आणि अगदी अशिष्ट हसायला आलं!
आपल्या मोजपट्ट्यांवर अमेरिकेतील जीवन मापताना तू केलेली निरीक्षणे सटीक आणि विचार करायला लावणारी!