अमेरिका जाणून घ्यायची तर तिचा थोडा इतिहासही पहाणं गरजेचं आहे.त्यामुळे आजची अमेरिका अजून चांगली पहाता येईल असं वाटलं. अमेरिकेमधल्या हजारो वर्षांपासूनच्या मूळच्या रहिवाश्यांना Native Americans म्हणतात. त्यांनी वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा जपल्या आहेत असं दिसतं. १४९२ मध्ये ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला आणि तेव्हापासून युरोपीय वसाहतवादाची सुरवात झाली. स्पेन, फ्रान्स, इंग्लंड या देशांमधील तसंच डच लोकांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. त्यामुळे अमेरिका हा आता बहुसांस्कृतिक देश आहे. इ.स. १६२० मधे इंग्रजांनी पिलग्रिम्स नावाने पहिली वसाहत प्लायमथ, मॅसॅच्युसेट्स (म्हणून पहा बरं काय गंमत येते ती ओठांची हालचाल करुन आणि पाहून) येथे वसवली. त्यानंतर ४ जुलै १७७६ रोजी अमेरिका स्वतंत्र झाली आणि युनायटेड स्टेट्स ॲाफ अमेरिका अशा स्वतंत्र देशाची स्थापना झाली. ब्रिटनने मात्र ते मान्य करायला १७८३ हे साल उजाडलं. १८६१ ते १८६५ या काळात दक्षिण आणि उत्तर अमेरिकेत गुलामगिरीविरुद्ध अंतर्गत युद्ध झालं पण अब्राहम लिंकन यांच्यामुळे गुलामगिरी संपुष्टात आली आणि हा देश एकसंध राहिला.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका जागतिक महासत्ता म्हणून उभा ठाकला. उच्च दर्जाची विद्यापीठं, तंत्रज्ञान, औषधनिर्मिती,आर्थिक व्यवहार,हॅालिवूड, फॅशन या सगळ्यात अग्रेसर रहाणायाचा प्रयत्न नंतरच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाकडून होत राहिला आहे. तरीही आज अमेरिकेसमोर हवामान बदल,आर्थिक विषमता, सामाजिक तणाव, गुन्हेगारी, आरोग्य,, स्थलांतरीतांचे प्रश्न,एआयमुळे कमी होत जाणारा रोजगार अशी आव्हाने आहेत. त्यांच्याशी सामना करणं कठीण होऊन बसलंय. ह्या सगळ्या पारश्वभूमीवर आजचं चित्रं तंत्रज्ञान, शिक्षण, सोशल मिडिया, ॲप्स यांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकणारं आहे.
तर चला मंडळी आज जायचं ना फायडाय ला ?अनेरिकेच्या आर्थिक राजधानीला भेट द्यायलाच हवी. इथवर येऊन तिथे नाही गेलो तर कसं चालेल ? कालच पाथचा प्रवास केल्यामुळे हालचालीत थोडं सरावलेपण आलं होतं. थंडीशी पण जुळवून घ्यायला जमलं होतं. WTC म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर या स्थानकावर उतरायचं होतं. सगळीकडे नावाचे फलक आणि निर्देशनाच्या खुणा असतात त्यामुळे प्रवास सोपा होतो. स्थानकावर उतरलो तर एक प्रचंड भव्य दिव्य पांढऱ्या शुभ्र रंगाचं मॅालवजा स्थानक समोर होतं. नुकतीच नाताळची सुट्टी संपली होती आणि थंडी असल्यामुळे त्यामानाने गर्दी कमीच होती. नाहीतर विविध देश, प्रांत, वर्णांचे लोक इथे गर्दी करतात. गर्दी कमी असली तरी जगभरातून आलेले वेगवेगळे लोक दिसतात. जसा म्युनिक शहराला हिटलरच्या शिस्तीचा वास येतो तसाच बलाढ्य आणि सत्ताधीश अमेरिकेत असाच सत्तेच्या कैफाचा वास हवेत भरलेला असतो. सगळं असं भलं मोठ्ठं , अबब म्हणावंसं वाटेल असं काही पाहिल्यामुळे दडपून जायला होतं. म्हणूनही तसं वाटत असेल का ?
अतिशय हळू आवाजात बोलायचं (पुटपुटल्यासारखं ?….असं म्हणून मनाशीच हसले), कोणी कोणाकडे पहायचं नाही, उजव्या बाजूनी चालायचं असं सगळं शिस्तबद्ध चालू असतं. खरंच इतक्या वेगवेगळ्या नागरिकत्वाची माणसं आजूबाजूला होती. सगळे स्वत:त रमलेले ! आपणही कोणाकडे पहात नाही कारण समोर इतकं सगळं खुणावत असतं. मी कितीही वेळा मोठ्ठं स्टेशन म्हटलं तरी तुम्हाला त्याचा अंदाज येईल की नाही कोण जाणे ? मगाशी सांगितलं तसा पांढरा शुभ्र रंग सगळीकडे लावलेला होता. अगदी स्पॅाटलेस ! वरती स्टीलच्या पण पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या असंख्य आडव्या रेषा जणू काही पंख पसरलेला पक्षी वाटावा. ह्याला ॲाक्युलस म्हणतात. कारण याची रचना डोळ्याच्या पापण्यांसारखी आहे. ९/११ च्या दुर्घटनेनंतर प्रतिकात्मक म्हणून हातातून कोणीतरी शांततेचं प्रतीक असणारं पांढरं कबुतर सोडतंय असा भास व्हावा अशी रचना आहे त्याची. स्थापत्यकलेचा आणि अगदी आधुनिक अशा अभियांत्रिकीच्या तंत्राचा नमुना म्हणूनही हे निश्चित पाहण्यासारखे आहे. कोणाला ते ॲाक्युलस या नावाप्रमाणे डोळ्यासारखं भासतं तर कोणाला हा पक्षी वाटतो. या दोन्ही प्रतिमा दिसाव्या अशीच रचना केलेली दिसते.मधे एक छोटीशी फट (म्हणजे त्याच्या आकारमानाच्या प्रमाणात छोटीशी) आहे त्यातून वन वर्ल्ड ट्रेड सेंटरचा मनोरा दिसतो तोही स्थापत्याचा एक सुंदर नमुना म्हणून पहायलाच हवा असा आहे. बाहेर पडल्यावर मान वर करुन आपल्या नजरेत न मावणारा असा वन वर्ल्ड ट्रेड सेंटरचा उंचच उंच मनोरा दिसतो.
तिथून ९/११ चं मेमोरियल पहायचं तर ३६ डॅालरचं तिकीट काढून जावं लागतं. अर्थात त्या दिवशी ते ३६ ला मिळालं. गुणाकार न करता ते स्वस्तच म्हणायचं कारण आत जर फार अपेक्षेनी गेलं तर भ्रमनिरास व्हायची शक्यता जास्त. कारण तसा बऱ्यापैकी इतिहास आणि घटनांची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असते. निष्पाप बळी गेले याची हळहळ जशी संवेदनशील मनाला वाटते तितकीच इथेही नक्कीच वाटत असते.
बाहेर मात्र जिथे ते दोन्ही टॅावर्स होते तिथे स्मारक म्हणून दोन मोठे चौकोनी हौद बांधले आहेत. त्यात सतत पाणी पडत असतं जे पाहून शांतता प्रस्थापित व्हावी हा संदेश जणू ते देत असतात . चारही बाजूच्या कठड्यावर त्या दिवशी त्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची नावे लिहीली आहेत. एकच वृक्ष जो त्या हल्लयाचा साक्षी असून पुन्हा बहरला असा वृक्षही पहायला मिळतो. ज्याचं नावच मुळी सर्व्हायवर ट्री असं ठेवलं आहे. लोक शांतपणे त्या परिसरात फिरत असतात. बहुतांश वेळेला गर्दी असते पण गोंगाट नसतो. तिथून पुढे चालत चालत आपण निघालो की Alexander Hamilton Gravesite आणि ट्रिनिटी चर्च पाहून पुढे गेलो की एका छोट्या मुलीचा पुतळा आपल्या दृष्टीस पडतो. फिअरलेस गर्ल चा. असं वाटतं की रस्त्याच्या मधोमध ही समोर काय बघत असेल ? तर ती न्यूयॅार्क स्टॅाक एक्सचेंजकडे बघत उभी आहे …चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास आणि कमरेवर हात ठेवून उभी असल्यामुळे देहबोलीमधे एक प्रकारचा ठामपणा दिसतो. असं म्हणतात की ती लिंग समानता आणि नेतृत्वाच्या भूमिकांमधे महिलांचा सहभाग अधोरेखित व्हावा यासाठी तशी आकृती तयार करण्यात आली आहे. जवळजवळ सगळेच पर्यटक तिथे फोटो काढतात. ही आठवण जपावी असं वाटत असावं.
आता आपण न्यूयॅार्क स्टॅाक एक्सचेंजच्या बिल्डिंगसमोर उभे असतो. अमेरिकेचा मोठ्ठा झेंडा फडकताना आपण पहातो आणि जगात ज्या काही आर्थिक उलाढाली होत असतील त्याची वेगळीच उर्जा त्या परिसरात आपल्याला जाणवते. वेगळंच वातावरण असतं. मधेमधे अनेक ठिकाणं येतात पण मला भावली ती स्टोन स्ट्रीट. ही १७ व्या शतकातील गजबजलेली बाजारपेठ होती. आजही इथे अनेक बार आणि रेस्टॅारंट्स पहायला मिळतात. जुन्या नव्याचा छान संगम पहायला मिळतो. मग येते ती लेहमन ब्रदर्स ही बिल्डिंग. १८५० साली जगातील सर्वात मोठी बॅंक म्हणून नावारुपास आली आणि २००८ साली जिने नीचांक अनुभवला अशी ही इमारत. पैसा किती अस्थिर असू शकतो हे अधोरेखित करणारी जागा.
अजून एका जागेबद्दल सांगावंसं वाटतं ती आहे. लव्हलेस टॅव्हर्न. साधारण १९७९ च्या सुमारास बांधकामादरम्यान याचा पाया सापडला. न्यू ॲमस्टरडॅमचा सिटी हॅाल म्हणून अस्तित्वात असलेले हे केंद्र सामाजिक आणि राजकीय घडामोडींचं केंद्र होतं. आज पुढारलेल्या या आर्थिक राजधानीला एक इतिहास आहे, एक पदर आहे जो इतिहासाची आठवण करुन देतो. मग येतो फ्रॅान्सेस टॅव्हर्न. हा नुसता बार नाही तर क्रांतीचा, युद्धाचा अवशेष आहे. १७१९ मधे बांधलेल्या या ठिकाणी जॅार्ज वॅाशिंग्टन यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना निरोप दिला होता.
हो आणि चार्जिंग बुलला कसं विसरुन चालेल ? आर्थिक आशावाद आणि ताकदीचं प्रतीक असलेला हा चार्जिंग बुल त्याची दखल घ्यायलाच हवी. लोक त्याच्या पुढे आणि पाठीमागे त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी उभे असतात. Good omen म्हणून ! अमेरिकेच्या बैलाला……….थांबा थांबा , मला म्हणायचंय अमेरिकेच्या बैलाला किती ते महत्व. 😁
मर्सर लॅब हे अजून एक ठिकाण आहे जे आर्टीस्ट्सना निश्चित आकर्षित करतं. इथे रॅाय नाचुमा या कलाकारच्या कलाकृती पहायला मिळतात. त्यात त्यांचं बालपण, निसर्गाचं आकलन आणि दृष्टी आणि गोष्टीरुपात ते मांडण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. अमूर्तातून ते मांडण्याचा त्यांचा प्रयत्न पाहण्यासारखा आहे.
चालत चालत लहान मोठी ३०/३५ ठिकाणं आपण पहातो. लहान मुलांच्या कुतूहलाने आपण पहात असतो त्यामुळे वेळ कसा जातो हे ही कळत नाही आणि दमायलाही होत नाही. परतीच्या प्रवासात आपण विचार करत रहातो की खरंच एकदा तरी पहायलाच हवं नाही का ? जरी प्रत्येक ठिकाण वेगळं असलं तरी अमेरिका आकर्षित करते. तशी प्रतिमा उभं करण्यात ज्यांचं म्हणून योगदान असेल त्यांचं कौतुक करायलाच हवं. एखाद्या देशाची अशी प्रतिमा, अशी ऐट, दिमाख, दरारा….नाव काहीही दिलं तरी हा प्रदेश वेगळाच आहे. म्हणूनच आधीचा इतिहास सांगितला. एका लेखात माझं म्हणणं मांडणं अवघडच आहे पण भावना पोचल्या असतील तर माझा प्रयत्न फसला नाही एवढं तरी म्हणता येईल. नाही का ?
भेटू लवकरच.
शुभांगी दातार
२०/०२/२५
छान जमवलेस लिखाण शुभांगी. या सगळ्या ठिकाणी मी पण जाऊन आली आहे. त्यामुळे नव्याने एकदा फेरफटका मारला तुझ्याबरोबर. तुझ्या नजरेने परत या गोष्टी या जागा पाहिल्या आणि अनुभवल्या . खूप मस्त वाटलं
मस्तच जमलंय शब्दांकन.. नेहमीप्रमाणेच 😊
तुझ्यामुळे पुन्हा एकदा तुझ्या शब्दातून अमेरिका पाहायला मिळते आहे.. आणि फोटो बघून तर खरंच त्या रस्त्यावरून चालतोय असा फील येतोय...
पुढच्या लेखाची वाट बघतेय 😊