रानवाटा
प्रवासवर्णन लिहिणं हे तसं जरा कठीणच काम आहे. माहिती स्वरूपातलं प्रवासवर्णन आणि अनुभव, अनुभूती या पातळीवरची प्रवासवर्णनं लिहीणं आणखी वेगळं. प्रत्येकाला आवडणारी गोष्ट जशी वेगळी असणार तसाच त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील वेगळा. दोन्हीमधला धोका असा की मग आपण पहाणाऱ्याला आधीच काहीतरी पूर्वग्रह (prejudices) बनवायला मदत करणार. म्हणजे काही अंशी त्याच्या त्या अनुभवाला आपल्या विचारांनी आधीच दिशा देणार. म्हणून लिहावं की नाही हा कायम पडणारा प्रश्न शेवटी मी एकदाचा सोडवून टाकला कारण ठिकाणच तसं होतं. San Francisco मधल्या Muir Woods, Redwood forests या जागेविषयी मी लिहायचं ठरवलं.
नुकतीच मी अमेरीकेत ३ महीने वास्तव्य केलं. मी जरी युटामधे रहात होते तरी तिथलं आगळंवेगळं सौंदर्य पाहून झाल्यावर San Francisco ला जाण्याचा मोह काही आवरतां आला नाही. Muir woods ही ऐतिहासिक दृष्ट्या एक महत्वाची जागा आहे. आता जंगल ही जागा भौगोलिकदृष्ट्या, पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाची असेल किंवा असते पण या जागेला ऐतिहासिक महत्व आहे म्हणून त्याविषयी थोडंसं. असं म्हणतात की हे जंगल Dinosauras इतकं जुनं आहे. जवळजवळ २ लक्ष वर्षांहून अधिक जुनं आहे असं इतिहास सांगतो.
इथे लाल सालीचे किंवा खोडांचे साधारण १०० मीटर उंचीचे वृक्ष आहेत. हे वृक्ष सर्वात जास्त उंचीचे आहेत. जेव्हा या जंगलाचा आणि त्यातल्या झाडांच्या उपयुक्ततेचा शोध लागला तेव्हा अर्थातच महासत्ता असलेल्या बलाढ्य अमेरिकेने त्यांवर ताबा मिळवण्याचा, अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु केला आणि या जागेचं, त्यातल्या वनसंपदेचं महत्व वाढत गेलं. एकदा का मानवानी कब्जा केला की त्याच्या ऱ्हासाला सुरुवात झालीच म्हणून समजावं.तसंच काहीसं या जंगलाच्या बाबतीत झालं. खूपशी वृक्षतोड झाली. सरतेशेवटी १९६८ साली या जंगलाला National Heritage असा दर्जा मिळाला. मग मात्र याच्या जतनासाठी प्रयत्न सुरु झाले. तरीही बराचसा भाग वृक्षतोडीमुळे नष्ट झालाय हे वाचून हळहळ वाटते आणि खेदसुद्धा. सर्वात जास्त Co2 ग्रहण करण्याची क्षमता असलेले हे वृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय परीषद देखील भरवण्यात आली होती म्हणूनच या जागेचं महत्व वाढत गेलं. कोणती होती ही परिषद ? हि होती फ्रँकलिन डी रूसवेल्ट यांना वाहिलेली आदरांजली.
United Nation delegates, representing 46 different nations, attending a memorial service for President Franklin D. Roosevelt in Muir Woods National Monument. (photo circa 1945.) Save The Redwoods League
"Here in this grove of enduring redwoods, preserved for posterity, members of the United Nations Conference on International Organization met on May 19, 1945, to honor the memory of Franklin Delano Roosevelt, thirty-first President of the United States, chief architect of the United Nations, and apostle of lasting peace for all mankind."
- Memorial Plaque in Cathedral Grove Muir Woods, 1945
सोन्याच्या खाणींचा शोध लागायच्या आधी हे redwood forest म्हणजेच सोन्याची खाण होती कारण ते ज्याच्याकडे असेल तो जगावर सत्ता गाजवायला, अधिपत्य करायला लायक होता. या redwood चं महत्व खरंतर प्रथम युरोपियन लोकांनी ओळखलं आणि इथे यायला सुरवात केली पण कालांतराने तिथे अमेरीकेतल्या लोकांनी सत्ता स्थापन केली कारण ते त्यांच्या मालकीच्या भूभागात किंवा त्यांच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत होतं. हे सुद्धा जेव्हा वाचलं तेव्हा हसू आलं की कसली सत्ता आणि ती पण निसर्गावर. बरोबर आहे म्हणा ती मालकी निसर्गावर नसून त्या नैसर्गिक संपदेवरची असते आणि त्यातून काहीतरी फायदा होणार असतो. नैसर्गिक आपत्ती किंवा या कोरोनाच्या काळात माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या मर्यादा अधोरेखितहोऊनसुद्धा आपण अजूनही सत्ता, हक्क या गोष्टी मिरवतोच आहोत. तरी पण हे तुझं, हे माझं असं करायचं काही आपण थांबत नाही. असो.
आता तिथल्या पर्यटनाविषयी. या जंगलामध्ये छोटे छोटे trails साठीचे मार्ग निश्चित केले आहेत. अशाच एका trail वर आम्ही पण गेलो होतो. त्याचं नाव होतं fern trail. नेच्याचे (fern) चे ५० हून अधिक प्रकार तर निश्चित पाहिले असतील. पायवाटे सारखा कधी पायऱ्यांचा तर कधी झाडांच्या पसरलेल्या मुळांमधून वाट काढत जाणारा हा उंचसखल trail वजा trek होता. चालता चालता आजूबाजूला असंख्य छोटी मोठी नेच्याची झाडं होती. काही काही पात्यांची लांबी तर जवळजवळ केळीच्या पाना एवढी. त्यांचे रंगही वेगवेगळे होते आणि उंच उंच वृक्षांमधून वाट काढत येणारं उन त्यांवर पडल्यामुळे ते फारच छान दिसत होतं. चालता चालता डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णीं यांच्या ‘पृथ्वीवर माणूस उपराच या पुस्तकाची आठवण आली. इतक्या भव्यदिव्य निसर्गामध्ये आपण किती नगण्य असतो नाही असा विचार मनात येऊन गेला.
शांत, प्रसन्न, नि:शब्द करणारा हा जवजवळ ७.५ किमीचा trail सुंदर तर आहेच पण एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा आहे. तसं तर निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेला वेळ आपल्याला नेहमीच खूप काही देऊन जातो. मधे मधे छोटासा ओहोळ असावा असे पाण्याचे साठे लागतात. जंगलाच्या शांततेलाही एक हवाहवासा वाटणारा आवाज असतो नाही. आपण अंतर्मुख होऊन आपल्याशीच संवाद करत असतो.
नुकत्याच एका विमान प्रवासा मधे एक वाक्य वाचलं की once you visit a particular place it stays with you forever. अगदी तसंच या Muir Woods च्या बाबतीत झालं. त्यांनी मनात घर केलं. परत परत जावंसं वाटेल असं हे स्थळ आहे. तिथली शांतता, तो जंगलाचा मंद सुवास, पक्ष्यांचा कलरव, त्याचा आपल्याशी चाललेला लपंडाव सगळं सगळं आपल्याला आठवत रहातं.
अजून एक आवर्जून सांगायची गोष्ट होती ती म्हणजे जाता जाता एका board वर लिहीलेलं काहीतरी वाचावं म्हणून एका ठिकाणी थांबलो तर तिथे लिहीलं होतं की या board वरची माहिती थोडीशी बदलावी लागणार आहे. का ? तर आता काही नवीन संदर्भ मिळालेत आणि त्यानुसार आता या माहितीत बदल करावे लागणार आहेत. लगेच मला आपल्याकडच्या राजकीय पक्षातल्या माणसांची वाढदिवसाची किंवा एखाद्या कार्यक्रमाची hoardings जी त्यानंतर तीन चार महीने अगदी सहजी बघायला मिळतात त्याची आठवण झाली. यात प्रश्न देशाला कमी लेखण्याचा अजिबात नसून त्याबद्दलच्या सजगतेबाबत होता आणि आहे. आपणही खरंतर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असे बदल करुन आपल्याच देशासाठी काही करण्याचं कर्तव्य पार पाडू शकतो. नाही का ? असो.
खूपसा भाग हा या red wood च्या वृक्षांचा आहे तर काही भाग हा इतर वृक्षांनी भरलेला आहे. या red wood च्या वृक्षांची रचना काही वेगळीच आहे. वृक्षाच्या साधारण एक तृतीयांश भागानंतर याच्या खोडाचं विभाजन होतं आणि तिथून चक्राकार अशा फांद्या फुटलेल्या दिसतात. गगनाला भिडण्यासाठी उंचीत वाढताना रुंदीतही ही झाडं विस्तारतात. एखादा डोंगर चढताना आपण आजूबाजूचा परिसर पहात, रमतगमत जावं तसंच काहीसं वाटलं मला. आपण एखादं वैयक्तिक शिखर गाठताना सर्वांगीण विकासासाठी आपला परीघ वाढवणंही तितकंच महत्वाचं हा संदेश देत असावेत हे वृक्ष. असं म्हणतात की आख्ख्या जंगलामध्ये एकच वृक्ष असा आहे की जो बियांपासून तयार झाला आहे म्हणून तो जणू काही या जंगलाचा जन्मदाता,पालक आहे असं मानलं जातं. इतर वृक्ष हे असेच या खोडांच्या विभाजनातून तयार झाले आहेत. इतक्या अजस्त्र वृक्षांच्या जंगलापुढे आपण माणसं इतकी खुजी दिसतो तेव्हा उंचावरुन ते वृक्ष आपल्याला हसत असतील का असा प्रश्न पडतो.
झाडांच्या खालच्या भागामध्ये जशी ढोली असते तसे पोकळ आकार तयार झाले आहेत ज्यामधे आपण सहज उभे राहू शकतो. गूढरम्य असं काही नसून उलट आपल्याला खुणावणारं,आपलंसं करणारं, काहीतरी positivity देणारं असं काही या जंगलामधे जरुर आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं म्हणावसं वाटलं कारण खरंच तशी सोयरीक या वृक्षांशी करावीशी वाटली. खरंतर तशी सोयरीक झाली आणि म्हणून या redwood forest विषयी लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.
मान उंचावून उंचावून त्या वृक्षांमधून अधूनमधून डोकावणारा आकाशाचा भाग म्हणजे कॅलिडोस्कोप मधून बदलत जाणाऱ्या नक्षीचा काहीसा भाग वाटला जणू. तेव्हा येतां येतां सूर्याची किरणं जेव्हा अधूनमधून फांद्यांमधून डोकावत होती तेव्हा लता मंगेशकरच्या गाण्यामधल्या ओळींची आठवण झाली…..ये पत्ते ये पेडोंके बादल घने रे, ये पल पल उजाले ये पल पल अंधेरे
डॉ . शुभांगी दातार
रेडवूड च्या झाडीचे मोठे खोड आणि त्याच्या बोगद्यातुन जाणारी आपली गाडी हा एक न विसरता येणारा अनुभव मव घेतला होता. त्याची आठवण झाली. लिहीन कधीतरी. मस्त वर्णन.
खूप छान वर्णन